होळी - एक लोकोत्सव
Wikipedia कडून
डॉ. रामचंद्र देखणे यांचा दै. सकाळ मध्ये दिनांक १३/०३/२००६ रोजी आलेला हा लेख मी उतरवुन घेतला, तोच पाठवत आहे.
होळी - एक लोकोत्सव
एक लोकोत्सव म्हणून होळीचा सण भारतातील सर्व भागांत मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या शेवटी येत असल्याने त्याला फाल्गुनोत्सव असेही म्हणतात, तर वसंत ऋतूच्या आगमनासाठी हा साजरा करावयाचा असल्याने त्याला वसंतोत्सव किंवा वसंतागन उत्सव असेही म्हणतात. वेगवेगळ्या भागांत याची वेगवेगळी नावे आहेत. याला शिमगा, होलिकादहन किंवा होळी, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. कोणी लहान मुलांना पिडा देणाऱ्या होलिका, ढुंढा किंवा पुतना यांसारख्या राखसींच्या दहनाच्या कथेत या उत्सवाच्या परंपरेचा शोध घेतात, तर कोणी मदनदहनाच्या कथेत या उत्सवाची परंपरा सांगतात; परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनाच्या परंपरेचा अविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पाहता, असे लक्षात येते, की हा सण मूलतः अगदी लौकिक पालळीवरचा असावा. नंतर त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक व सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली. आजच्या लौकिक होलिकोत्सवात अनेक पदर सामावलेले दिसतात. त्यात होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर सहज उठून दिसतात. त्यांनाच होळी, धुळवड आणि रंगपंचमी या नावाने ओळखतो. जडवाद आणि भोगवाद यांना जाळून त्याची धुळवड करून जीवनाच्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करावयाचा हा सण. समाजातील असदवृत्तींना भस्मसात करून त्याच्या नावाने शिमगा करीत सदवृत्तीचा जयघोष करण्याचा हा उत्सव.