सागरा प्राण तळमळला

From Wikipedia

ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळला ॥धृ॥


भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।

मी नित्य पाहिला होता ॥

मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।

सृष्टिची विविधता पाहूं ॥

तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।

परि तुवां वचन तिज दिधले ॥

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।

त्वरित या परत आणिन ॥

विश्वसलो या तव वचनीं । मी

जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी

तव अधिक शक्त उद्धरणीं । मी

येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला

सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥


शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।

ही फसगत झाली तैशी ॥

भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।

दशदिशा तमोमय होती ॥

गुणसुमनें मी वेचियली या भावें ।

की तिने सुगंधा घ्यावें ॥

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।

हा व्यर्थ भार विद्येचा ॥

ती आम्रवृक्षवत्सलता । रे

नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥

तो बाल गुलाबहि आतां ॥ रे

फुलबाग मला, हाय पारखा झाला ।

सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥

--विनायक दामोदर सावरकर