गोवा मुक्ती: १९६१चे युद्ध (गोवा, दमण व दीव)

Wikipedia कडून

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता.

गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.

१९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.