फटका
From Wikipedia
समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी!
कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरुं नको चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलुं नको अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको नास्तिकपणिं तुं शिरुनि जनाचा बोल आपण घेउ नको आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको मायबापांवर रुसूं नको दुर्मुखलेला असूं नको व्यवहारमंधि फसूं नको कधीं रिकामा बसूं नको परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥ १ ॥ वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको बुडवाया दुसयाचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहुं नको एकाहुनि चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवु नको हिमायतीच्या बळे गरिबगुरिबांला तूं गुरकावु नको दो दिवसांची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको विडा पैजेचा उचलुं नको उणी कुणाचे डुलवु नको उगिच भीक तूं मागुं नको स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥ २ ॥ उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करुं नको वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्रि नको कष्टाची बरि भाजिभाकरी, तूपसाखरे चोरुं नको दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकुं नको सुविचारा कातरुं नको सत्संगत अंतरुं नको द्वैताला अनुसरुं नको हरिभजना विस्मरुं नको सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥ -अनंतफंदी